thevoiceofnews.com

महाराष्ट्र ताज्या घडामोडी
द व्हॉइस ऑफ न्यूज - निर्भीड पत्रकारिता

अकोला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांच्या नावाची चर्चा; नियुक्तीचा तिढा सुटण्याची शक्यता

शेअर करा :

जीवन सोनटक्के

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अकोला जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचा गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पदासाठी आक्रमक मराठा चेहरा म्हणून ओळख असलेल्या संदीप पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, लवकरच त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे.

अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू होती. गटबाजी आणि अंतर्गत मतभेदांमुळे नियुक्तीचा निर्णय लांबणीवर पडल्याने ग्रामीण भागातील पक्ष संघटनेवरही त्याचा परिणाम झाल्याचे चित्र होते. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता वरिष्ठ पातळीवरून या नियुक्तीसंदर्भात हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संदीप पाटील यांच्या नावाला पक्षातील विविध गटांकडून अनुकूलता असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामीण भागातील जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याची त्यांची शैली यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळत असल्याची चर्चा आहे. पक्षातील ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्याची क्षमता त्यांच्या जमेची बाजू मानली जात आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामीण भागात संघटनात्मक बळ मिळविण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत संदीप पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्यास पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना नव्याने सक्रिय करण्याचे आव्हान पक्षासमोर असेल.

दरम्यान, संदीप पाटील यांच्या नावाची चर्चा जोर धरत असली, तरी त्यांच्या नियुक्तीबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय आणि त्यावरील अधिकृत शिक्कामोर्तब याकडे अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top