अकोला : भीमाशंकर येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा क्षेत्रासंदर्भातील आपले ज्ञान वाढवावे, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे. कोळशाची आयात केल्याने त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू वाढू शकते, मात्र, अस्तित्वात असलेल्या ऊर्जा प्रकल्पांचा योग्य वापर करून, पर्यावरणाची हानी न करता आणि झाडे न तोडता विजेची कमतरता भरून काढता येऊ शकते, असा दावा त्यांनी केला.

अदानी यांच्या म्हणण्यावर अवलंबून न राहता ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्याचा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.केवळ पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भीमाशंकर येथे जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधावा आणि त्यानंतर स्थानिक काय करतात हे त्यांनी पाहून घ्यावे असेही ते म्हणाले.. दरम्यान, कर्जत येथील हा प्रकल्प अदानी यांचाच असून, केवळ त्यावरील चेहरे बदलण्यात आले आहेत, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना ठोका, या आपल्या आधीच्या विधानावरही प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा भाष्य केले. कोणत्या सत्ताधाऱ्याला विरोध करायचा, याचा निर्णय जनतेने स्वतः घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच, या प्रकरणात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिकाही आंबेडकर यांनी मांडली.
भीमाशंकरमधील वृक्षतोड, ऊर्जा प्रकल्प आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. आता त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
