अकोला : अवैध शस्त्र बाळगणा-या आणि गंभीर गुन्हे करण्याच्या उद्देशाने फिरणा-या व्यक्ती वर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वाहनतळासमोरील लोखंडी गेटजवळ सापळा रचून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसे आणि मोटरसायकलसह एकूण ९,५७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या पथकाने ०९ ऑक्टोबर रोजी अकोला शहर हद्दीत पेट्रोलिंग व गोपनीय कारवाई करीत असताना, एक इसम निळ्या रंगाच्या सुझुकी जिक्सर मोटर सायकलवर शरीराविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने व लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी कमरेला देशी कट्टा लावून येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. संतोष नरसिंग ठाकूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळून देशी कट्टा २ मॅग्झीनसह तसेच ०२ जिवंत काडतुसे एक मोटरसायकल व मोबाईल फोन असा एकूण ९,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामदास पेठ येथे गुन्हा दाखल केला.


