जीवन सोनटक्के
अकोला : दिवाळी सणाच्या खरेदीसाठी आलेल्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या एका आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरी गेलेले ७ महागडे मोबाईल, एकूण किंमत १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
फिर्यादी संतोष रामदास जवादे, वय ५२ वर्षे, रा. भवानी नगर, कॅनालच्या बाजूला, अकोला यांनी रिपोर्ट दिला की, सकाळी ९ ते १०.३० वाजता दरम्यान ते शनी मंदिर समोर, गांधी रोड, अकोला येथे दिवाळी साहित्य खरेदी करत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या खिशातील VIVO कंपनीचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. यावरून पो.स्टे. सिटी कोतवाली येथे अप क्र. ३७७/२०२६ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली कारवाई –
या गुन्ह्याच्या तपासात डी.बी. पथकाने गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी *करणकुमार टमाटर नोनीया, वय २५ वर्षे, रा. बाबुपूर तीन पहाड, तिनहर, आर. एस. साहेब गंज, जि. साहेबगंज, राज्य झारखंड* यास निष्पन्न करून ताब्यात घेतले. असा एकूण १,५०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक निलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथील पोलीस निरीक्षक संजय गवई व डी.बी. पथकाचे पोहवा अजय भटकर, पोहवा ख्वाजा शेख, पोहवा किशोर येउल, पोकॉ शैलेश घुगे व पोकॉ आकाश जामोदे व पोकॉ गणेश डुमपल्लू यांनी केली असून पुढील तपास पोहवा किशोर येउल हे करीत आहेत.

